मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

माचणूर (Machnur) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर - पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वहात जाणार्‍या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या मंदिराजवळच माचणूरचा किल्ला आहे.
11 Photos available for this fort
Machnur
इतिहास :
दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्या पासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.

या किल्ल्याच नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराची पिंड (शिवलींग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास - नूर असे म्हटले जाऊ लागले.पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.
पहाण्याची ठिकाणे :
माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारा समोर भिंत व दोन बुरुज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदीच्या मागिल बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे.

सिध्देश्वर मंदिर :- माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायर्‍या उतरून दुसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्‍या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्‍यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
माचणूर गाव सोलापूर - पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी व पंढरपूरपासून २१ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १२ किमी अंतरावर आहे. गावात जाणार्‍या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...