मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) किल्ल्याची ऊंची :  4200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग गेली आहे.. याच डोंगररांगेला त्र्यंबक रांग असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्‍या टप्प्यात ब्रम्हगिरी, अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. प्राचीन काळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा एक मार्ग याच रांगेतून जात असे, म्हणून त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी किल्ला उभारला गेला होता. हा किल्ला मध्ययुगीन काळापासून अजिंक्य आहे. हा किल्ला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेले "त्र्यंबकेश्वर" या नावाने प्रसिद्ध आहे.


Trimbakgad (Bramhgiri)
6 Photos available for this fort
Trimbakgad
Trimbakgad
Trimbakgad
इतिहास :
त्र्यंबकेश्वर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे असणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावरून उगम पावणारी गौतमी गंगा ऊर्फ गोदावरी या ठिकाणाहून दक्षिणवाहिनी होते, त्यामुळे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील किल्ल्यांचे उल्लेख पुराणातही आढळतात. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी गौतम ऋषींनी केली, पण गंगा मात्र राजी नव्हती तेव्हा शंकराने आपल्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. गौतमांचं गोहत्येचं पाप निवारण करून गाईलाही सजीव केलं म्हणून तिचं नाव पडलं गोदावरी. सिंहस्थ काळात जेव्हा गुरू सिंह राशीत असतो, तेव्हा सर्व देव देवता, नद्या, सरोवरे, तीर्थ गोदावरीत वास करतात, त्यामुळे सिंहस्थात गोदावरीला जास्त महत्त्व आहे.
ब्रम्हगिरी हे नाव कसे पडले, यामागे सुद्धा एक आख्यायिका आहे. एकदा विष्णू ब्रम्हदेवाला म्हणाले की, पुष्कळ तप केले परंतु अजूनही शिवाचे ज्ञान मला झाले नाही तेव्हा त्या दोघांनी ठरविले की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध लावायचा. पण पुष्कळ शोध घेऊनही त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यांनी केतकी आणि पुष्प यांची खोटी साक्ष उभी केली आणि ब्रम्हाने सांगितले की मी महादेवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. शिवाने कृद्ध होऊन गायीलाही शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला की, भूतलावर पर्वत होऊन राहशील. रागाचा हा आवेग ओसरल्यावर त्याने शाप मागे घेतला आणि त्याने भूतलावर पर्वताचे रूप घेतले आणि त्याचे नाव ब्रम्हगिरी ठेवले.

इ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.

इ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’.
यावर बादशहा म्हणतो, ‘‘त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा, त्याचे चीज होईल हे जाणावे.’’
यानंतर मातबार खान किल्ला कसा घेतला, हे औरंगजेबाला पत्रातून कळवितो, ‘ गुलशनाबाद नाशिकच्या ठाण्यात आमचे सैन्य फार थोडे होते. या भागात मराठ्यांच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या पसरल्या ही परिस्थिती पाहून मी त्र्यंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ त्र्यंबक किल्ल्याचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले. आपल्या कृपेने त्र्यंबकचा किल्ला आमच्या ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना कोणत्या मनसबी द्यावयाच्या याचा तपशील सोबतच्या यादीवरून दिसून येईल. त्याची अर्जी आणि किल्ल्याच्या किल्ल्या या काका मनसबदार भावाबरोबर पाठविल्या आहेत, त्या पहाण्यात येतील’.
याशिवाय मातबरखान म्हणतो, ‘‘त्र्यंबक किल्ल्याच्या मोहिमेत औंढा किल्ल्याचा श्यामसिंग, याचा मुलगा हरिसिंग याने जमेतीनशे कामगिरी केली आहे. त्याच्या बरोबर तीनशे स्वार व हजार पायदळ देऊन मी त्याला त्र्यंबकचा किल्ला सांभाळण्याच्या कामावर नेमले आहे. नवीन किल्लेदार नेमून येईपर्यंत तो हे काम सांभाळील.’‘ मातबरखान या पत्रात अशी मागणी करतो,’‘साल्हेरचा किल्ला नेकनामखान याने असोजी कडून ताब्यात घेतांना त्याला जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली, तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना दयावी.’’
किल्ला ताब्यात आल्यावर औरंगजेब फर्मान पाठवितो, ‘‘मातबरखानाने जाणावे की तुमची अर्जी पोहोचली. आपण त्र्यंबकचा किल्ला जिंकून घेतला असून त्र्यंगलवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला असल्याचे कळविले आहे. त्र्यंबकच्या किल्ल्या आपण पाठविल्या त्या मिळाल्या तुमची कामगिरी पसंत करण्यात येत आहे. तुमच्या स्वत:च्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात येत आहे. तुम्हाला खिलतीचा पोशाख, झेंडयाचा मान आणि तीस हजार रूपये रोख देण्यात येत आहे.’’
पुढे १६९१ च्या सुमारास या भागात मराठयांचे हल्ले वाढले. पुढे या भागातील अधिकारी मुकबरखान बादशहास कळवितो, ‘‘त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यु झाला आहे. त्याचा मुलगा लहान आहे, तो कर्जबाजारी आहे. सावकाराचा तगादा चालू आहे. त्रिंबकगड सांभाळणे शक्य नाही. कोणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा, नाहीतर किल्ल्यावर भयंकर संकट कोसळेल.’’
इ.स १७१६ मध्ये शाहूने किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली, पण ती फेटाळली गेली. इ.स. १७३० मध्ये कोळयांनी बंड करून तो घेतला. पुढे १८१८ पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता.
पहाण्याची ठिकाणे :
ब्रम्हगिरी ऊर्फ त्रिंबकगडाचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठार आहे. पठारावर पोहोचल्यावर पायर्‍यांच्या वाटेने समोरच्या उंचवटयाच्या दिशेने चालावे. मध्येच एक वाट डावीकडे ‘सिद्धगुंफे’ पाशी जाते. या ठिकाणी कडयात खोदलेली एक गुहा आहे. ही पाहून पुन्हा वाटेला लागावे. पुढे थोडयाच वेळात पायर्‍यांची वाट दुभागते. प्रथम उजवीकडच्या वाटेला वळावे १५ मिनिटांतच आपण मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणीच गौतमी गंगेचा ऊर्फ गोदावरी नदीच्या उगमाचे स्थान आहे. हे सर्व पाहून डावीकडच्या वाटेला वळावे. १० मिनिटांतच आपण दुसर्‍या मंदिराजवळ पोहोचतो. याच ठिकाणी शंकराने आपल्या जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली हे सर्व पाहून परतीच्या वाटेला लागावे.
याशिवाय किल्ल्यावर काही प्राचीन वाडयांचे अवशेष आहेत. समोरच त्र्यंबक रांगेतील अंजनेरी, हरिहर किल्ले दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्याचा मार्ग त्र्यंबकेश्वर गावातूनच जातो. त्र्यंबकेश्वर मंदिराकडून पुढे गंगाव्दाराकडे चालत जायचे. गंगाव्दाराकडे जाणार्‍या पायर्‍या जिथे सुरू होतात. तिथून डावीकडे एक पायवाट दिसते, त्या वाटेने चालत जायचे. ही वाट पुढे दुसर्‍या पायर्‍यांच्या वाटेला जाऊन मिळते. एक तास पायर्‍या चढून गेल्यावर किल्ल्याच्या पहिल्या व्दारापाशी येऊन पोहोचतो. पुढे कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साहयाने दरवाजा गाठावा. मंदिरापासून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, मात्र पायथ्याच्या त्र्यंबकेश्वर गावात राहण्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्स आहेत.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय त्र्यंबकेश्वर गावात आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
त्र्यंबकेश्वर मंदिरापासून दीड तास लागतो.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...