मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चौगावचा किल्ला (Chaugaon Fort) किल्ल्याची ऊंची :  2000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातपुडा
जिल्हा : जळगाव श्रेणी : मध्यम
जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे. प्राचीन काळी सातपुडा पर्वतातून अनेक व्यापारी मार्ग मध्यप्रदेश आणि उत्तरेकडील भारतात जात होते. त्यासाठी सध्याच्या जळगाव जिल्ह्यात असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत खांडारागड, चौगावचा किल्ला, पालचा किल्ला हे किल्ले बांधले होते. चौगावचा किल्ला हा प्राचीन भिराम घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता . सातपुडा रांगेतील जळगाव जिल्ह्यात सध्या असलेल्या तीन किल्ल्यात चौगावचा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. या किल्ल्या जवळ असलेल्या त्रिवेणी संगमामुळे या किल्ल्याला त्रिवेणीगड या नावानेही ओळखले जाते. किल्ल्यावरचे सर्व अवशेष व्यवस्थिती पाहायचे असल्यास गावातून वाटाड्या सोबत न्यावा.
23 Photos available for this fort
Chaugaon Fort
Chaugaon Fort
Chaugaon Fort
पहाण्याची ठिकाणे :
चौगावातून कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो . या रस्त्यावरून जीप सारखे वाहन पावसाळ्याचे दिवस वगळता साधारणपणे किल्ल्याच्या अलीकडे १ किलोमीटर पर्यंत जाऊ शकते . पुढे मात्र चालतच जावे लागते. येथून पुढे १० मिनिटे चालत गेल्यावर त्रिवेणी संगम लागतो या ठिकाणी ३ ओढ्यांचा संगम आहे . संगमा जवळील उंचवट्यावर शंकराचे मंदिर आहे. एक ओढा ओलांडून आपण मंदिरापाशी पोहोचतो . मंदिरात शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाजूच्या पत्र्याच्या शेड मध्ये पंचमुखी हनुमंताची मुर्ती आहे. चौगाव किल्ला आणि हा मंदिराच्या आसपासचा भाग वनक्षेत्रात येत असल्याने याठिकाणी मुक्काम करता येत नाही .

मंदिर पाहून दुसरा ओढा ओलांडला की समोर एक टेकडी आहे . ही टेकडी चढून गेल्यावर आपल्याला समोर किल्ला आणि त्यावर लावलेला भगवा झेंडा दिसतो. १० मिनिटात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी, झेंडा लावलेल्या बुरुजाच्या खाली पोहोचतो. येथून पायवाट उजवीकडे वळून चढत किल्ल्याच्या डोंगराच्या घळीमध्ये पोहोचते. याठिकाणी एकेकाळी दगडात कोरलेल्या आणि बांधलेल्या पायऱ्या होत्या. या पायऱ्या चढताना डाव्या बाजूला जाणारी एक पायवाट दिसते. या पायवाटेने २ मिनिटे चालल्यावर दोन खांब टाकी पाहायला मिळतात. ही खांब टाकी पाहून परत पायऱ्याच्या वाटेवर येउन ५ मिनिटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारापाशी येतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार अजूनही भक्कम स्थिती उभे आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूंना देवड्या आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक बुजलेला तलाव आहे. त्याच्या बाजूने पुढे गेल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिरात शेंदूर लावलेला अनघड दगड आहे. मंदिराच्या आजूबाजूला काही कोरीव दगड पडलेले आहेत . एकेकाळी येथे दगडात बांधलेले मंदिर असावे . मंदिरा समोर झेंडा लावलेला आहे. तोच आपल्याला त्रिवेणी संगमावरुन दिसत असतो.

देवीचे दर्शन घेउन मंदिराच्या मागून जाणाऱ्या पायवाटेने पुढे जाऊन खाली उतरल्यावर आपण कातळात कोरलेल्या टाक्यांच्या समुहापाशी पोहोचतो. या ठिकाणी ४ टाकी कोरलेली आहेत. टाक्यातले पाणी पिण्यायोग्य नाही. टाक्यांच्या मागच्या बाजूला एक छोटी टेकडी आहे . या टेकडीवर एक वाडा आहे. या वाड्या पर्यंत जाण्यासाठी टाक्यांच्या डाव्या बाजूने वाट आहे. त्या वाटेने टेकडीला वळसा घालून चढाई करत आपण ५ मिनिटात वाड्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी वाड्याच्या भिंतीला एक भगदाड पाडलेले आहे. त्या भगदाडातून आपण वाड्यात प्रवेश करायचा. वाड्याचे छत आणि आतील भिंती नष्ट झालेल्या आहेत. वाड्यात सागाची आणि इतर मोठी झाडे आहेत. वाड्याच्या भिंतीवर विटा उभ्या आडव्या तिरप्या रचून केलेले नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे . वाडयाच्या भिंतीत जंग्या,कोनाडे आणि कमानदार खिडक्या आहेत. वाडा पाहात पुढे जात, आपण वाड्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारातून बाहेर पडतो . इथून डावीकडे जाणारी वाट एका घळीत उतरत जाते, तर समोर जाणारी वाट किल्ल्याच्या दुसर्‍या भागात जाते. घळीत उतरणारी वाट फारशी मळलेली नसल्याने सापडणे कठीण आहे . पण समोर दिसणाऱ्या घळीत उतरायला सुरुवात करावी . साधारणपणे ५ मिनिटात आपण किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख प्रवेव्दारापाशी पोहोचतो . प्रवेशद्वार भक्कम स्थितीत उभे आहे . प्रवेशव्दारातून बाहेर पडून उजव्या बाजूला वळून किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या पुढच्या (गावाकडील बाजूला येउन) खाली उतरता येते. किंवा आल्या वाटेने परत घळ चढून किल्ल्याच्या दुसर्‍या (घळ चढून आल्यावर डाव्या बाजूला) भागात असलेल्या टेकडीवर जाता येते . या भागात जंगल वाढलेले असल्याने कुठलेही अवशेष आढळत नाहीत .

हा भाग बघून झाल्यावर पुन्हा वाड्यापाशी येउन वाड्या मार्गे मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते . किल्ल्याला तटबंदी अथवा बुरुजांचे अवशेष दिसत नाहीत. किल्ल्याच्या डोंगराला वरील बाजूस असलेल्या कातळ टोपीमुळे ताशीव कडे तयार झालेले आहेत . त्याचाच किल्ल्याच्या संरक्षणासाठी उपयोग केलेला असावा आणि योग्य ठिकाणी प्रवेशद्वारे आणि त्याला जोडून आवश्यक तेवढीच तटबंदी बांधलेली असावी .

किल्ला पाहाण्यासाठी एक तास लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
चौगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. चोपडा या तालुक्याच्या गावापासून चौगाव १२ किलोमीटर अंतरावर आहे . चोपडा ते जळगाव हे अंतर ५० किलोमीटर आहे. जळगाव - चोपडा मार्गावर एसटीच्या बसेस धावतात. तसेच चोपडा - चौगाव या मार्गावर दर तासाला चोपड्याहून एसटीच्या बसेस आहेत. चोपडा गावातून कच्चा रस्ता त्रिवेणी संगमापर्यंत जातो. हे अंतर अंदाजे २ किलोमीटर आहे . यापैकी एक किलोमीटर पर्यंत जीप आणि मोटार सायकल सारख्या वाहानाने जाता येते. पुढे किल्ल्यापर्यंत चालतच जावे लागते. गावापासून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यास पाऊण तास लागतो. किल्ला चढण्यासाठी अर्धा तास लागतो.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही .
जेवणाची सोय :
चोपडा गावात जेवणाची सोय होते .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गावापासून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यास पाऊण तास लागतो. किल्ला चढण्यासाठी अर्धा तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सप्टेंबर ते मार्च
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: C
 चाकणचा किल्ला (Chakan Fort)  चांभारगड (Chambhargad)  चंदन वंदन (Chandan-vandan)  चंदेरी (Chanderi)
 चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  चांदवड (Chandwad)  चापोरा किल्ला (Chapora Fort)
 चौगावचा किल्ला (Chaugaon Fort)  चौल्हेर (Chaulher)  चावंड (Chavand)  कुलाबा किल्ला (Colaba)