मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

तांदुळवाडी (Tandulwadi) किल्ल्याची ऊंची :  1900
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर
जिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम
तांदुळवाडी किल्ला पश्चिम रेल्वेवरील सफाळे स्टेशनच्या ईशान्य दिशेला सुमारे साडेचार किमी अंतरावर आहे. वृक्षवेलींनी मंडीत असा हा सुंदर गड मुंबईकरांसाठी एका दिवसात पाहाण्याजोगा आहे.
5 Photos available for this fort
Tandulwadi
इतिहास :
या गडाचा इतिहास संक्षिप्त स्वरुपात ठाणे गॅझेटिअर्स मध्ये पाहावयास मिळतो. तो येणेप्रमाणे ;
’तांदुळवाडी किल्ला माहीमच्या (केळवे माहीम) आग्नेय दिशेस सुमारे १६ किमी अंतरावर असून हे स्थान ५७९ मीटर्स (सुमारे १९०० फूट) उंचीच्या डोंगरावर आहे. सफाळे रेल्वे स्टेशनच्या ईशान्येस ४.८० किमी अंतरावर हा किल्ला आहे. मराठ्यांनी इ.स. १७३७ साली हा किल्ला हस्तगत केला होता. या डोंगरमाथ्यावर पाषाणात खोदलेली अनेक पाण्याची टाकी, जलकुंभ असून तटबंदीच्या खुणाही आढळतात. डोंगराच्या पूर्व पायथ्याजवळून वैतरणा नदी वाहते. नदीशेजारीच ललठाणे नावाचे खेडे वसलेले आहे. गावाजवळच जलसंचयिका असून ती पोर्तुगीजांनी बांधली असावी.
तेराव्या शतकात राजा भीमदेव याचे राज्य समुद्राकाठी शूर्पारक (नालासोपारा), महिकावती(माहीम) येथे होते. पुढे इ.स. १४५४ साली अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती सर केले. त्यांच्यापैकी एका बहादूरशहाने मलिक अल्लाउद्दीन नावाच्या सरदाराला तांदुळवाडीचा किल्लेदार केले. त्यानंतर या भागावर पोर्तुगीजांनी अंमल बसविला. पेशव्यांच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या हातात आला.
पहाण्याची ठिकाणे :
पायथ्यापासून गडावर चढून गेल्यावर दगडांनी रचलेली तुटक अशी चार फूट उंचीची तटबंदी आहे. या तटबंदीच्या दिशेने पुढे गेल्यास गडाच्या मध्यभागी चौकोनी हौद दिसतो. भिंत उजवीकडे ठेवत, तिच्या बाजूने थोडे खाली उतरल्यावर पश्चिम टोकाकडून येणारी वाट दिसते. या वाटेवरून पुढे गडाच्या पूर्व व पश्चिम कड्यापाशी खडकात खोदलेली पाण्याची सुमारे पंचवीस कुंडे किल्ल्याचे अस्तित्व दर्शवितात. गडावरुन आजूबाजूचा परिसर दिसतो. या गडावरील रानात विविध जातींची वृक्षवेली, वनौषधी व अनेक जातींचे पशुपक्षी आढळतात
पोहोचण्याच्या वाटा :
तांदुळवाडी मार्गे :-
तांदुळवाडी किल्ल्यावर येण्यासाठी विरारमार्गे सफाळेला यावे. तेथून तांदुळवाडी गावात जाण्यासाठी एसटी व खाजगी जीप उपलब्ध आहेत.
तांदुळवाडी गावात पोहोचल्यावर डांबरी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने गडावर जाता येते. या पायवाटेने चालत राहिल्यास १५ मिनिटांत गडाखालची सपाटी येते. पुढे एका घळीतून वर चढत गड गाठता येतो .
याशिवाय दुसरी वाट म्हणजे रोडखड नावाच्या आदिवासी पाड्यातून गडावर जाता येते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही , स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
तांदुळवाडी गावातून दोन तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सर्व ऋतुमध्ये .
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: T
 ताहुली (Tahuli)  तैलबैला (Tailbaila)  टकमक गड (Takmak)  तळगड (Talgad)
 तांदुळवाडी (Tandulwadi)  टंकाई (टणकाई) (Tankai)  तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)  थाळनेर (Thalner)
 तिकोना (Tikona)  तोरणा (Torna)  त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)  त्रिंगलवाडी (Tringalwadi)
 तुंग (Tung)  तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat))