मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वेताळगड (Vetalgad) किल्ल्याची ऊंची :  440
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मालवण, सिंधुदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : मध्यम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर तलाव आणि पेंडूर या ऐतिहासिक गावाजवळ वेताळगड उभा आहे. वेताळगडाचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. किल्ल्या शिवाय पेंडूर गावातील वेताळ मंदिर, सातेरी मंदिर, जैन अवशेष आणि धामापूर तलाव या ऐतिहासिक गोष्टी पाहाण्या सारख्या आहेत.


12 Photos available for this fort
Vetalgad
Vetalgad
Vetalgad
इतिहास :
वेताळगडावरील अवशेष पाहाता हा पूरातन किल्ला असावा. पुढील काळात कोल्हापूरकर छत्रपतींना शह देण्यासाठी कोल्हापूर ते सिंधुदुर्ग या मार्गावर सावंतानी इसवीसन १७८६ मध्ये वेताळगड हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेताळाच्या मंदिरावरुन किल्ल्याला वेताळगड नाव दिले. वेताळगड ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरकर छत्रपतींनी आपले सैन्य मालवण जवळील नांदोस गढी येथे पाठवले. त्या सैन्याने सावंतांचा पराभव करुन वेताळगड जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
गडाचा माथा म्हणजे लांबलचक पसरलेला सडा (पठार) आहे. जांभ्या दगडाच्या या सड्यावर गडाचे अवशेष विखुरलेले आहेत. पावसाळ्यानंतर मार्च पर्यंत सड्यावर गवत वाढलेले असल्यामुळे अनेक अवशेष त्यात लपले जातात. गावडेवाडीतून गडाच्या माथ्यावर आल्यावर उजव्या बाजूने गडफ़ेरी चालू करावी. उजव्या बाजूला डोंगराचा कडा ठेऊन ५ मिनिटे चालत गेल्यावर . एका दगडावर कोरलेला वेताळाचा मुखवटा व त्यावर आडवी कोरलेली पावल पाहायला मिळतात. हे पाहून डाव्या बाजूला वळून गडाच्या मध्यभागाकडे असलेल्या झेंड्याच्या दिशेने चालत गेल्यावर कातळात कोरलेली दोन पावल पाहायला मिळतात. या पावलांच्या जवळ सध्या भगवा झेंडा लावलेला आहे. ही पावल पाहून झेंड्याच्या पुढे थोडेसे चालत गेल्यावर एक सुकलेले टाकं आहे.

टाकं पाहून उत्तर दिशेला चालत गेल्यावर गडाच्या पूर्व कड्या जवळ कातळात कोरलेली दोन पावल पाहायला मिळतात. तेथून थोडे पुढे चालत गेल्यावर किल्ल्याचा जांभ्या दगडात कोरुन काढलेले उत्तराभिमुख प्रवेश्व्दार दिसते. आता या प्रवेशव्दाराची पडझड झालेली असली तरी प्रवेशव्दारा जवळ दरवाजासाठी असलेली खाच आणि काटकोनात बांधलेला प्रवेशमार्ग पाहायला मिळतो. या मार्गाने वेताळवाडीत उतरता येते. पण सध्या ही वाट झाडी झाडोर्‍याने बंद झालेली आहे.

प्रवेशव्दार पाहून डावीकडे म्हणजेच पश्चिमेकडे वळून थोडे अंतर चालून गेल्यावर सुकलेले जोड टाकं पाहायला मिळते. सध्या त्यात झाड उगवलेली आहेत. ही जोड टाक पाहून पुन्हा मागे वळून गड प्रवेश केला त्या दिशेला म्हणजेच दक्षिणेला चालायला सुरुवात करावी. उजव्या बाजूला चिर्‍यात केलेल्या बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. हे अवशेष पाहून किल्ल्यात प्रवेश केला त्या जागी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते.गडफ़ेरी पूर्ण करण्यास पाऊण तास लागतो.


पोहोचण्याच्या वाटा :
१) मालवणहून कट्टा गाव साधारण २० किमी वर आहे. कट्टा गावातून एक रस्ता पेंडूर गावाकडे जातो. या रस्त्यावर पेंडूरच्या पुढे ३ किमीवर मोगराणे गावातील गावडेवाडी नावाची वाडी आहे. गावडेवाडी पर्यंत खाजगी गाडीने (किंवा पेंडूर मधून रिक्षाने) पोहोचता येते. या वाडीतून गडावर जाण्याची वाट आहे. गावडेवाडीत डांबरी रस्ता जेथे संपतो तेथून एक कच्चा रस्ता सुरु होतो. या रस्त्याने डोंगर चढायला सुरुवात केल्यावर एक पायवाट डावीकडे जाते. या पायवाटेने १० मिनिटे चालल्यावर वाट दाट झाडीत शिरते या वाटेने ५ मिनिटे चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

२) मालवण -चौके - साळेल - मोगरणे या मार्गानेही वेताळगडा खालील गावडेवाडीत पोहोचता येते.

मालवणहून पेंडूरला जाण्यासाठी एस्टी बस आहे, पण त्या दिवसातून ठराविक वेळीच आहेत. मालवण ते कट्टा या मार्गावर दिवसभर एसटी गाड्या आहेत. कट्ट्याला उतरुन रिक्षाने थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ: मोगरणे गावडेवाडीतून वेताळगडावर जाण्यास २० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जानेवारी ते मे
सूचना :
किल्ल्याच्या आजूबाजूला दाट झाडी आहे. माणसांचा वावर नाही . त्यामुळे किल्ल्यावर वन्यजीव व सापांचा वावर आहे. त्यामुळे किल्ल्यावर फ़िरतांना योग्य ती काळजी घ्यावी.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: V
 वैराटगड (Vairatgad)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसई (Vasai)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)
 वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विजयदुर्ग (Vijaydurg)  विजयगड (Vijaygad)
 विलासगड (Vilasgad (Mallikarjun))  विसापूर (Visapur)  विशाळगड (Vishalgad)