मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अवचितगड (Avchitgad) किल्ल्याची ऊंची :  950
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रोहा
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. रोह्यापासून ५ किमी वर असलेल्या पिंगळसई गावापासून गडाची उंची ३०० मी भरते. घनदाट झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग सुखद झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला हा किल्ला कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
4 Photos available for this fort
Avchitgad
Avchitgad
Avchitgad
पहाण्याची ठिकाणे :
मेढा गावातून येणारी वाट बुरुजा खालून पूर्व दिशेच्या प्रवेशव्दारातून गडावर जाते. या वाटेवर एक वीरगळ आहे .पूर्वाभिमुख प्रवेशव्दाराच्या जवळ एका दगडावर शरभाचे शिल्प कोरलेले आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस म्हणजेच उत्तर दिशेने पुढे गेल्यावर एक दगडी पाण्याचे भांडे पाहायला मिळते. या ठिकाणी उध्वस्त वास्तूचे चौथरे आहे. त्याच्या बाजूने पुढे उत्तर टोकाकडे चालत जातांना एक तोफ़ पाहायला मिळते . या तोफ़ेच्या पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावर पोहोचतो याठिकाणी बुरुज आहे. त्यावर भगवा ध्वज लावलेला आहे. उत्तर टोकावरील बुरुजावरुन परत येतांना मध्ये असलेल्या उंचवट्यावर चढून गेल्यावर तेथे टेहळणी बुरुज पाहायला मिळतो.

किल्ल्याच्या उत्तर भाग पाहून, पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन दक्षिण दिशेला जातांना एक उध्वस्त वास्तूचा चौथरा लागतो. उजव्या बाजूला एक पाण्यचे टाकं आणि तोफ़ आहे. थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याचा मधिल भाग पूर्व-पश्चिम तटबंदी बांधून संरक्षित केलेला पाहायला मिळतो. तटबंदीच्या उजव्या बाजूला प्रवेशव्दार आहे. तर डाव्या बाजूची तटबंदी ढासळलेली आहे. त्यातून आत प्रवेश केल्यावर बुरुजाच्या भिंतीत शरभ शिल्प कोरलेला दगड आहे. पुढे गेल्यावर एक मोठा तलाव आहे. तलावाजवळ महादेव मंदिर आहे. त्यात एक शिलालेख ठेवलेला आहे. त्याच्या पुढे उध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत. ते पाहून आल्या मार्गाने परत येऊन तटबंदीत असलेल्या छोट्या प्रवेशव्दारातून आत शिरावे. आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला विहिर आहे. विहिरीच्या पुढे एक बुरुज आहे. बुरुजाच्या पुढे उध्वस्त वास्तूचे अवशेष आहे. त्यासमोर टाक्यांचा समुह आहे. एका टाक्याच्या भिंतीवर एक घुमटी व वीराचे दगडावर कोरलेले शिल्प आहे, ते बाजी पासलकरांचे शिल्प आहे असे मानले जाते. या टाक्यांचा समुहा जवळ पिंगळाई देवीचे छोटेसे मंदिर आणि एक दिपमाळ आहे. पुढे किल्ल्याची पूर्व-पश्चिम पसरलेली दुसरी तटबंदी आहे. त्याच्या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर दक्षिणेकडे जातांना उध्वस्त वास्तूचे चौथरे पाहायला मिळतात. पुढे पूर्व-पश्चिम पसरलेली तिसरी तटबंदी आहे. त्याच्या दोन्ही बाजूला उध्वस्त बुरुज आहेत. मध्ये टेहळ्णी बुरुज आहे. बुरुजावर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. या तटबंदीत असलेल्या किल्ल्याच्या दक्षिण प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर एक लाकडी पूल आहे. तो ओलांडून गेल्यावर समोर एक उंचवटा दिसतो. त्याच्या डाव्या बाजूने (पूर्वेकडून ) जाणार्‍या पायवाटेने वळसा मारुन पश्चिमेकडे आल्यावर एक नैसर्गिक गुहा पाहायला मिळते. ही गुहा पाहून परत किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडफेरीस १ तास लागतो.

किल्ल्यावरुन नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इत्यादी परिसर न्याहाळता येतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) मेढा मार्गे :-
मुंबई - रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ किमी अंतरावर असलेल्या मेढा या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. वाट दाट झाडांमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोर्‍यातील मेढा व पिंगळसई ही गावे दिसतात.

२ पिंगळसई मार्गे :-
अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ किमी आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे.

३ पडम मार्गे :-
गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना, रोहा-नागोठणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वरापाशी घेवून जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पिंगळसई मार्गे १ तास, तर पडम मार्गे २ तास लागतात.
सूचना :
१) रोहा परिसरात ४ किल्ले येतात. नीट नियोजन केल्यास, स्वत:च्या वहानाने , तळागड, ,घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहून होतात.

२) घोसाळगड, बिरवाडी व तळागड या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)