मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

खर्डा (Kharda) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : नगर श्रेणी : सोपी
११ मार्च १७९५ रोजी मराठ्यांची संयुक्त फ़ौज व निजाम यांची लढाई खर्डा किल्ल्यापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दौंडाची वाडी या गावाजवळ असलेल्या पठारावर झाली. या भागाला रण टेकडी या नावाने ओळखले जाते. रणांगणात मार खाल्यावर निजामाने माघार घेत खर्ड्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. त्यामुळे खर्ड्य़ाची लढाई म्हणून या लढाईची इतिहासात नोंद झाली. खर्ड्याचा किल्ला, खर्डा गावातील निंबाळकरांची गढी, वाडा आणि समाधी , ओंकारेश्वर मंदिर या ऐतिहासिक गोष्टी पाहाण्या सारख्य़ा आहेत.
43 Photos available for this fort
Kharda
Kharda
Kharda
इतिहास :
११ मार्च.१७९५-रंगपंचमीच्या दिवशी खर्डा किल्ल्याजवळ झालेल्या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फ़ौजांनी निजामाचा पराभव केला. या लढाईसाठी पानिपत युद्धा नंतर प्रथमच हिंदुस्थान भर पसरलेल्या मराठी सरदारांच्या फौजा एकत्र आल्या होत्या.

इ.स.१७१८ मध्ये मराठे व सय्यद बंधूंमध्ये झालेल्या करारानुसार मराठ्यांना दक्षिणेकडील सहा सुभ्यांमधून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मिळाले होते.सहा सुभ्यात निजामाच्या सुभ्याचाही समावेश होता.. मराठ्यांची फौज आल्यावर निजाम काही रक्कम देत असे त्यामुळे १७९५ साल उजाडेपर्यंत थकबाकीची रक्कम तीन कोटीपर्यंत पोहोचली होती. ती वसूल करण्यासाठी आणि निजामचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मराठ्यांनी निजामा विरुध्द युध्द पुकारले.

उत्तर हिंदुस्थानातून शिंदे, होळकर, भोसले, पवार व अन्य मराठा सरदार आपापल्या फौजा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाल्या . पुण्यातून निघालेली सवाई माधवराव,परशुराम भाऊ पटवर्धन यांची फ़ौज त्यांना जाऊन मिळाली.

निजामाने बिदर तेथे आपली फौज गोळा केली होती, तो बिदरहून अहमदनगरच्या रोखाने निघाला . निजामाच्या फौजेत ४५ हजार घोडेस्वार,४४ हजार पायदळ व १०८ तोफा होत्या तर मराठ्यांच्या संयुक्त फ़ौजेत ८४ हजार घोडेस्वार, ३८ हजार पायदळ व १९२ तोफा होत्या.

११ मार्च, १७९५ रोजी रंगपंचमी होती. त्या दिवशी दोन्ही फौजा खर्ड्या जवळ आमनेसामने येऊन त्यांच्यात दिवसभर युद्ध झाले. संध्याकाळच्या सुमारास निजामाने माघार घेऊन खर्ड्याच्या किल्ल्यात आश्रय घेतला . त्याने तहाची बोलणी सुरु केली. तहानुसार मराठ्यांना त्याने आपला दिवाण ,३० लाख रुपये रोख व ३० लाखांचा प्रदेश दिला.
पहाण्याची ठिकाणे :
आयताकृती आकाराचा खर्डा किल्ला ५ एकर परिसरावर पसरलेला आहे. किल्ल्याच्या सभोवती खंदक आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दारा समोरील खंदक बुजवून तिथपर्यंत कच्चा रस्ता केलेला आहे. किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशव्दार दोन बुरुजांच्या मध्ये लपवलेले आहे. प्रवेशव्दारावर फ़ारशी शिलालेख आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला देवड्या आहेत. किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. या प्रवेशव्दारावर देवनागरी लिपीतील शिलालेख आहे. किल्ल्याच्या या दोन प्रवेशव्दारा मधील मोकळ्या जागेला "रणमंडळ" म्हणतात. याची रचना अशा प्रकारे केलेली असते की, किल्ल्याचा पहिला दरवाजा भेदून शत्रू रणमंडळात पोहोचला की तो चारही बाजूंनी माराच्या टप्प्यात येतो.
किल्ल्याच्या प्रवेशव्दारावर जाण्यासाठी जीना आहे. जीन्याने प्रवेशव्दारावर चढून गेल्यावर प्रशस्त फ़ांजी आहे. किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशव्दाराच्या बाजूच्या बुरुजावर एक तोफ़ ठेवलेली आहे. तोफ़ेच्या बाजूला झेंडा लावलेला आहे. हे सर्व पाहून रणमंडळात उतरुन दुसर्‍या प्रवेश्व्दारातून किल्ल्यात जातांना देवड्या पाहायला मिळतात. यापैकी एला देवडीत तोफ़गोळे आणि वीरगळ ठेवलेल्या आहेत. दुसर्‍या दरवातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. डाव्या बाजून गडफ़ेरी चालू केल्यावर तटबंदीत असलेली एक खोली पाहायला मिळते. त्याच्या समोरच्या बाजूला एका पडक्या वास्तूचे अवशेष दिसतात. त्या ठिकाणी धान्य कोठार व दारू कोठार असावे. या कोठारांच्या मागे एका वाड्याचे जोते पाहायला मिळते. या ठिकाणी एक दगडी उखळ पडलेले आहे. वाड्याच्या उजव्या बाजूला जामा मशिद आहे. मशिदीत फ़ारसी शिलालेख आहे. मशिदी समोर जात्याचे चाक पडलेले आहे.
मशिदीच्या मागे किल्ल्यातील सुंदर वास्तू म्हणजे चावीच्या आकाराची विहीर (बारव) आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आणि कमान असलेला दरवाजा आहे. विहिरीच्या वर मोट बांधण्यासाठी दगडी खांब आडवे बसवलेले आहेत. मोटेने काढलेले पाणी जाण्यासाठी दगडी पन्हाळी आणि साठवण्यासाठी हौद केलेला आहे. याठिकाणी एक दगडी धोणी पडलेली आहे. विहिरीच्या मागच्या बाजूला तटबंदीत चोर दरवाजा आहे. सध्या तो बंद केलेला आहे. चोर दरवाजा पाहून तटबंदीच्या बाजूने किल्ल्याच्या प्रवेशव्दारकडे निघाल्यावर एका ओळीत असलेल्या वास्तूचे चौथरे पाहायला मिळतात. पुढे तटबंदीत अजून एक चोर दरवाजा आहे पण, तो भिंत बांधून बंद केलेला आहे. इथून प्रवेशव्दाराकडे आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ल्याच्या तटबंदीत अनेक ठिकाणी जीने आहेत. त्या जीन्यांनी फ़ांजीवर चढून किल्ल्याला फ़ेरी मारता येते. तटबंदीची उंची अंदाजे ४० फ़ूट असून फ़ांजी १५ फ़ूट रुंद आहे. तटबंदीत जागोजागी जंग्या असून बुरुजावर तोफ़ा ठेवण्यासाठी चौथरे बांधलेले आहेत. त्याखाली छोट्या खोल्या आहेत. तटबंदीवरून फ़ेरी मारून मुख्य प्रवेशव्दारातून बाहेर पडून उजवीकडे जाणार्‍या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर किल्ल्याच्या मागच्या बाजूला तटबंदी व बुरुज बांधलेले दिसतात. या बाजूने किल्ल्याचे संरक्षण मजबूत करण्यासाठी या परकोटाची बांधणी केली असावी. या बुरुजात खोल्या पाहायला मिळतात. या पायवाटेने किल्ल्याला बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा घालून परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गड पाहाण्यासाठी एक तास लागतो.

खर्डा किल्ला पूरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंतच पाहाता येतो.

किल्ला पाहून झाल्यावर एसटी स्थानकच्या बाजूच्या रस्त्याने खर्डा बाजारपेठेत जावे. या ठिकाणी निंबाळकरांचा वाडा आहे. सध्या तो वाडा शाळेला दिलेला आहे पण त्याची पडझड झाल्याने वाडा आता वापरात नाही. वाड्यात एक आड आहे. बाजारपेठेत असलेल्या अनेक घरांच्या दारा खिडक्यांवर कोरलेली नक्षी पाहाण्यासारखी आहे. गावात पुढे गेल्यावर निंबाळकरांची गढी पाहायला मिळते याला माती , विटांचे ४ बुरुज चार बाजूला आहेत. वाडा उंचवट्यावर असल्याने २० पायर्‍या चढून प्रवेशव्दारापर्यंत जाता येते. या दुमजली वाड्याची अवस्था खराब आहे , तो मोडकळीला आला आहे त्यामुळे त्यात प्रवेश करता येत नाही . वाड्याचा दरवाज्याच्या कमानीवर सुंदर नक्षीकाम आहे. डाव्या बाजूला हत्ती आणि बैलाचे लाकाडात कोरलेले शिल्प आहे.
वाडा पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण निंबाळकरांच्या छत्री पाशी (समाधी) पोहोचतो. राजस्थानी शैलीत बांधलेल्या या छत्रीवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. घुमटा खाली एक शिवलिंग आहे. छत्रीच्या बाजूला दोन तुळशी वृंदावन आहेत. त्यातील एका वृंदावनावर गणपतीची मुर्ती कोरलेली आहे. तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक बारव आहे. आत उतरण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. बारवेच्या समोर ओंकारेश्वराचे मंदिर आहे. दगडी बांधणीच्या मंदिरात गणेशाची मुर्ती व शिवलिंग आहे. मंदिरा समोरील नंदी मंडपात शिव आणि पार्वतीचे दगडी मुखवटे ठेवलेले आहेत.
खर्डा गावातील या वास्तू पाहून झाल्यावर खर्ड्याची लढाई झाली ते ठिकाण म्हणजे रणटेकडी पाहाण्यासाठी पुन्हा एसटी स्थानकापाशी यावे . एसटी स्थानकाच्या पुढे एक रस्ता तरटगाव , सोनेगाव मागे दोंड्याची वाडी या गावत जातो . खर्डा ते दोंड्याची वाडी अंतर १० किलोमीटर आहे. दोंड्याच्या वाडीतून रणटेकडी १ किलोमीटर अंतरावर आहे. कच्च्या रस्त्याने एक किलोमीटर चालून गेल्यावर उजव्या बाजूच्या टेकडीवर एक भगवा झेंडा व तोफ़ दिसते. टेकडीवर ११ मार्च १७९५ रोजी झालेल्या खर्ड्याच्या लढाईचे स्मारक बनवलेले आहे. टेकडीवरुन आजूबाजूचा पठारी भाग (युध्दभूमी ) पाहाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
खर्डा हे गाव रस्त्याने सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. मुंबई, कल्याण, पुणे, नगर या सर्व शहरातून इथे एसटी बसेस येतात.
रेल्वेने :- रेल्वेने :- १) मुंबई - सोलापूर मार्गावरील कुर्डूवाडी हे जवळचे स्टेशन आहे. कुर्डूवाडीहून खर्डा ७२ किमीवर आहे.
२) मुंबई - लातूर मार्गावरील बार्शी हे जवळचे स्टेशन आहे. बार्शी - खर्डा ५२ किमी अंतर आहे.
राहाण्याची सोय :
खर्डा गावात राहाण्यासाठी हॉटेल्स नाहीत.
जेवणाची सोय :
खर्डा गावातील हॉटेल्स मध्ये नाश्त्याची आणि जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: K
 कैलासगड (Kailasgad)  काकती किल्ला (Kakati Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)  कलाडगड (Kaladgad)
 कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))  काळदुर्ग (Kaldurg)  कळसूबाई (Kalsubai)  कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))
 कमळगड (Kamalgad)  कामणदुर्ग (Kamandurg)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कांचन (Kanchan)
 कंधार (Kandhar)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))  कण्हेरगड (Kanhergad(Nashik))  कंक्राळा (Kankrala)
 कर्‍हा (Karha)  करमाळा (Karmala Fort)  कर्नाळा (Karnala)  कात्रा (Katra)
 कावनई (Kavnai)  केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  केंजळगड (Kenjalgad)
 खैराई किल्ला (Khairai)  खांदेरी (Khanderi)  खर्डा (Kharda)  खारेपाटण (Kharepatan fort)
 खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोहोजगड (Kohoj)  कोकणदिवा (Kokandiva)  कोळदुर्ग (Koldurg)
 कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  कोंढवी (Kondhavi)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  कोर्लई (Korlai)
 कोटकामते (Kotkamate)  कुलंग (Kulang)  कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)