मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

निवतीचा किल्ला (Nivati Fort) किल्ल्याची ऊंची :  300
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मालवण, सिंधुदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेला, मालवण पासून १० किमी व वेंगुर्ल्यापासून १५ किमी सागरी अंतरावर असलेल्या निवती गावातील समुद्रात शिरलेल्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी निवतीचा किल्ला बांधला. मालवणजवळ असलेली कर्ली खाडी ते वेंगुर्ला ह्या सागरी भागावर निवतीच्या किल्ल्यातून लक्ष ठेवता येते.


Nivati Fort
3 Photos available for this fort
Nivati Fort
इतिहास :
इतिहास :
सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा ताबा पुढे सावंतवाडीकर सावंतांकडे गेला. १७४८ साली पोर्तुगिजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माईल खानने निवतीवर हल्ला करुन तो जिंकून घेतला. १७८७ साली करवीरकर छत्रपती व सावंत यांच्यात झालेल्या लढाईत करवीरकरांनी किल्ला जिंकला. १८०३ मध्ये गडाचा ताबा परत सावंतांकडे आला. ४ फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
चिरेबंदी पायर्‍यांच्या वाटेने गड चढतांना आपल्याला प्रथम पायर्‍र्‍यांच्या दोंन्ही बाजूस असलेला २० ×१० फूटी खोल खंदक दिसतो. सध्या तो झाडीने झाकलेला आहे. याच वाटेने आपण भग्न तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश करतो. येथे डाव्या बाजूला दोन भव्य बुरुजांमध्ये प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आहेत, पण प्रवेशद्वारापुढील मार्ग तुटल्यामुळे त्यातून प्रवेश करता येत नाही. तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन पायवाटा फूटतात. समोर जाणार्‍या पायवाटेने गेल्यास उजव्या बाजूस एक भव्य बुरुज दिसतो. तिथून पुढे गेल्यावर अजून एक भव्य़ बुरुज त्यावरील जंग्यासह पाहायला मिळतो. या बुरुजा जवळून खालच्या बाजूस अप्रतिम भोगवे बिच व कर्ली खाडी पर्यंतचा परिसर दिसतो. येथून डाव्या हाताला वळून समुद्राच्या दिशेला चालत गेल्यावर गडाच्या पश्चिम टोकावरुन पायथ्याला समुद्रात असलेले नारींगी रंगाचे खडक पहायला मिळतात. याच ठिकाणाहून उजव्या बाजूस समोर अरबी समुद्र व दूरवर वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे दिपगृह दिसते. येथे एक खड्डा व त्यात उतरणार्‍या कातळात खोदलेल्या पायर्‍या पाहायला मिळतात. येथे खोदीव टाक असण्याचा संभव आहे. हे पाहून परत प्रवेशव्दारापाशी येऊन डाव्या बाजूच्या पायवाटेने गेल्यावर आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. गडाचा बालेकिल्ला खंदक खोदून संरक्षित केलेला आहे. बालेकिल्ल्याची प्रवेशव्दारे, देवड्या, तटबंदी अजूनही शाबूत आहेत. तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. बालेकिल्ल्यात जुन्या वास्तूंचे चौथरे आहेत. बालेकिल्ला पाहून झाल्यावर किल्ल्याची भ्रमंती संपते.
निवती किल्ल्यावर आपल्याला पाण्याची व्यवस्था कुठेही दिसत नाही, ती किल्ल्याखाली केलेली आहे त्याला स्थानिक लोक ‘शिवाजीची तळी‘ या नावाने ओळखतात. ती पाहाण्यासाठी किल्ला उतरतांना सरळ रस्त्याने गावात न जाता, उजव्या बाजूला समुद्राकडे उतरणार्‍या रस्त्याने खाली उतरावे. येथेच ‘शिवाजीची तळी‘ नावाची पाण्याची टाकी आहेत. पुन्हा मुळ रस्त्याने निवती किनार्‍यावर गेल्यास छोटीशी पुळण व त्यावरुन समुद्रात घुसलेला २० फूटी खडक पाहायला मिळतो. याला ‘जुनागड‘ म्हणतात. पुळणीच्या बाजूने त्यावर चढता येते. निवती पासून ८ किमी वरील परूळे गावात वेतोबा मंदीर संकुल आहे. त्यातील प्रमाणबद्ध कोरीव मूर्ती व वीरगळ पहाण्यासारखे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
मालवण व कुडाळ या दोंन्ही शहरातून निवती किल्ल्यावर जाता येते.
१) मालवण मार्गे:- मालवण बस स्थानकातून सागरी महामार्गाने जाणार्‍या वास्को, पणजी, वेंगुर्ला इत्यादी बसने परुळे गावातील "परुळे बाजार" ह्या थांब्यावर उतरावे. तेथून किल्ले निवतीला जाणार्‍या बसेस मिळू शकतात. परंतू किल्ले निवतीला जाणार्‍या बसेस मोजक्याच असल्यामुळे परुळे बाजारातून रिक्षा करुन ७ किमी वरील किल्ल्यापर्यंत जाणे सोयीस्कर पडते. मालवणहून निवती साधारण २५ किमी वर आहे.

२) कुडाळ मार्गे:- कुडाळ बस स्थानकातून "किल्ले निवती" बसने निवती गावात थेट जाता येते. येथे "किल्ले निवती" व निवती अशी दोन गावे आहेत. किल्ला "किल्ले निवती" गावात आहे.

३) किल्ले निवती गावातील बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरुन उजव्या बाजूच्या लालमातीच्या कच्च्या रस्त्याने १० मिनीटे चढाई केल्यावर निवती किल्ल्याजवळ पोहोचता येते.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही
सूचना :
मालवणहून खाजगी वहानाने सकाळी निघून निवतीचा किल्ला(२५ किमी) + यशवंतगड रेडी(४० किमी) + तेरेखोलचा किल्ला(७ किमी) पाहून मालवणला परत येता येते किंवा तेरेखोलहून(४० किमी) पणजीला मुक्कामी जाता येते.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: N
 नगरचा किल्ला (Nagar Fort)  नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)
 नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))  नाणेघाट (Naneghat)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (Narayangad)
 नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)  नस्तनपूरची गढी (Nastanpur)  न्हावीगड (Nhavigad)
 निमगिरी (Nimgiri)  निवतीचा किल्ला (Nivati Fort)