मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) किल्ल्याची ऊंची :  1357
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदूर्ग. अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. छ. शिवाजी महाराजांसारख्या दुरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्यातील समुद्र किनार्‍याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनार्‍यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे.


Sagargad (Khed Durg)
21 Photos available for this fort
Sagargad
इतिहास :
सागरगड कोणी व केव्हा बांधला हे अज्ञात आहे. इ.स १६६० शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी गडावरुन खांदेरी - उंदेरी ही बेटे पाहिली व इंग्रज व सिध्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची योजना आखली. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्‍याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.

संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला.

छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्‍यांनी येथे विश्रामधामे बांधली होती.
पहाण्याची ठिकाणे :

सागरगडवर जाण्यासाठी आपल्याला एक डोंगर व पठार पार करुन जावे लागते. खंडाळे गावातून डोंगराकडे जाताना पावसाळ्यात दोन टप्प्यात पडणारा ‘‘धोंदाणे’’ धबधबा आपल्याला प्रथमदर्शनी दिसतो. या धबधब्याच्यावर सिध्देश्वर मंदिर व मठ आहे.

सागरगडाचे प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे. सागरगडाचा आकार इंग्रजी ‘वाय’ अक्षरासारखा आहे. याच्या दोन सोंडापैकी डाव्या हाताच्या सोंडेपुढे काही अंतर सोडून वर आलेला एक उत्तुंग सुळका दिसतो. या सुळक्याला ‘वानरटोक’ म्हणतात.

किल्ल्यावरील उंचवट्याला ४ मीटर उंचीची तटबंदी व ५ बुरुज बांधून बालेकिल्ला बनवण्यात आला आहे. बालेकिल्ल्याच्या पुर्वेकडील तटबंदी समोर खोदलेला खंदक आता बुजलेला आहे. येथेच बालेकिल्ल्याचा चोर दरवाजा व ढासळलेली तटबंदी आहे. या ढासळलेल्या तटबंदीवर चढाई करुन बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. बालेकिल्ल्यात उंचवट्यावर पत्र्याचे देऊळ आहे. त्यात महिषासूरमर्दिनी, गणपती व शिवलींग यांच्या दगडात कोरलेल्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या खालच्या बाजूला कड्याच्या टोकाला पाण्याचे कुंड आहे. या कुंडातील गोमुखातून नितळ पाण्याची संततधार पडत असते.

कुंडाच्या पुढे किल्ल्याच्या दोन सोंडा दोन बाजूला जातात. उजव्याबाजूच्या सोंडेवर एक समाधी आहे. त्याला सतीचा माळ म्हणतात. डाव्या बाजूच्या सोंडेवर इंग्रजांनी बांधलेल्या विश्रामधामाचे अवशेष आहेत. किल्ल्यावरुन खांदेरी- उंदेरी हे किल्ले, अलिबागथळचा समुद्रकिनारा, धरमतरची खाडी, माथेरान, प्रबळगड हे किल्ले, चौलची खाडी असा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो.


पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्याची मुख्य वाट मुंबई - अलिबाग रस्त्यावरील खंडाळे गावातून आहे. मुंबईहून अलिबागला जाताना कार्ला खिंड ओलांडल्यावर अलिबागच्या अलिकडे ४ किमी अंतरावर खंडाळे गाव लागते. या गावात (अलिबाग कडे जाताना डाव्या हाताला) जाणारा रस्ता एका डोंगराच्या पायथ्याशी जातो. या डोंगरामागे सागरगड लपलेला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी जाणारी सडक अर्धी कच्ची आहे, त्यामुळे पावसाळा सोडल्यास गाडी पायथ्यापर्यंत नेते येते, डोंगराच्या पायथ्याशी ओढा आहे. ओढा ओलांडल्यावर बांधीव पायर्‍यांची वाट डोंगरावर जाते. उभ्या चढणाची ही वाट अर्धा तास चढल्यावर आपल्याला २ वाटा लागतात. त्यातील उजव्या हाताच्या वाटेने आपण २ मिनीटात एका टेपावर येतो. तेथून समोरच दोन टप्प्यात पडणार्‍या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते. परत मुळ वाटेवर आल्यावर अर्ध्या तासात आपण सिध्देश्वर मंदिरात येतो.

सिध्देश्वर मंदिराच्या अलिकडे असलेली वाट डोंगर पठारावरील सागरगड माची गावात अर्ध्यातासात नेते. याच वाटेने गावातून पुढे गेल्यावर व डोंगराला वळसा घातल्यावर सागरगडाची तटबंदी दिसू लागते. अजून अर्ध्यातासात आपण कोसळलेली तटबंदी चढून बाले किल्ल्यात प्रवेश करतो.
सागरगड माची गावातून सागरगडाकडे जाताना ठिकठिकाणी दगडावर बाणांच्या खुणा केल्या आहेत, त्या पाहूनच पुढे जाणे. विशेषत: पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याचा संभव असतो. याशिवाय गडावर पोयनाडहून वाघोली मार्गे जाता येते. तसेच वडवली गावातून गडावर जाता येते.

राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही, सिध्देश्वर मंदिरात किंवा सागरगडमाचीवरील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकेल. खंडाळे गावातील समाजमंदिरात रात्री पथारी पसरता येईल.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, परंतू सिध्देश्वर मठात चहा मिळू शकतो.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
खंडाळे गावातून २ तास लागतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: S
 सडा किल्ला (Sada Fort)  सदानंदगड (Sadanandgad)  सदाशिवगड (Sadashivgad)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)
 सज्जनगड (Sajjangad)  साल्हेर (Salher)  सालोटा (Salota)  सामानगड (Samangad)
 सामराजगड (Samrajgad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  संतोषगड (Santoshgad)
 सप्तश्रुंगी (Saptashrungi)  सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))
 साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  सेगवा किल्ला (Segawa)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 शिवगड (Shivgad)  शिवनेरी (Shivneri)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))
 सिध्दगड (Sidhhagad)  सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सिंदोळा (Sindola)
 सिंहगड (Sinhagad)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort))  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सोंडाई (Sondai)  सोनगड (Songad)  सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))
 सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुधागड (Sudhagad)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 सुमारगड (Sumargad)  सुरगड (Surgad)  सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)