मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan)) किल्ल्याची ऊंची :  500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मालवण, सिंधुदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : मध्यम
प्राचिनकाळी मालवण बंदर, आचरा बंदर या ठिकाणी उतरणारा माल अनेक मार्गांनी घाटावरील बाजारपेठात जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी त्याकाळी मोक्याच्या जागी किल्ले बांधण्यात आले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सिध्दगड हा किल्ला मालवण, आचरा बंदरहून घाटमाथ्यावरील आजरा या बाजारपेठेकडे जाणार्‍या मार्गावरील घोटगीच्या घाटावर व कसाल नदीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.


18 Photos available for this fort
Siddhagad (Malvan)
Siddhagad (Malvan)
Siddhagad (Malvan)
इतिहास :
सिद्धगडाची बांधणी सावंतवाडीच्या सावंतांनी केली . इसवीसन १७४८-४९ मध्ये तुळाजी आंग्रेनी सावंतांच्या मुलुखावर चढाई करीत सिद्धगडाचा ताबा घेतला. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी १७५५ मध्ये आंग्रेच्या विरुध्द इंग्रजांच्या मदतीने मोहीमच उघडली, त्यावेळी खंडोजी माणकर व कृष्णाजी महादेव यांच्या नेतृत्त्वाखाली पेशव्यांचे सैन्य सिद्धगडावर चालून गेले व फेब्रुवारी १७५६ मध्ये त्यांनी सिद्धगडावर पेशव्यांचा ताबा मिळविला.

पुढे सावंतानी निम्बाबाई शिंदे (महादजी शिंदेच्या मातोश्री) यांना मध्यस्थी करुन सिद्धगडाचा ताबा पेशव्यांकडून परत आपल्याकडे आणला. पुढे कुडाळ देशस्थ प्रभू व सावंतवाडीकर यांच्या वादात पेशव्यांनी प्रभूची बाजू घेतली. त्यांनी आपला सरदार नारो त्रिंबक याला सावंतांच्यावर पाठविले. त्यांनी सिद्धगडापर्यंतचा सावंतांचा मुलूख जिंकून घेतला. शिंदेचे सरदार जिवबांदादांच्या मध्यस्थीमुळे पेशव्यांनी डिसेंबर १७९३ ला सिद्धगड परत सावंताच्या ताब्यात दिला. मात्र किल्ला परत देताना सिद्धगडाचा मागील खर्च म्हणून पेशव्यांनी २२०००/- रुपये सावंताकडून वसूल केले.

सन १८०५-०६ मध्ये सावंताच्या वारसा हक्काच्या तंट्यात फोंड सावंताने करवीरकरांना मदतीस बोलाविले. किल्लेदार नारायण रुद्राजी याने गड करवीरकरांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून साळशी महालाचा पेशव्यांचा अंमलदार चिटकोपंत याच्याकडून पैसे घेऊन सिद्धगडाचा ताबा पेशव्यांकडे दिला. या घटनेनंतर सावंतवाडीकरांनी चिटकोपंत व रांगण्याचे किल्लेदार राणोजी नाईक- निंबाळकर या दोघांकडेही मदत मागितली. हे दोघेही आपापले सैन्य घेऊन आकेरीला दाखल झाले. तेथे राणोजींनी अचानक चिटकोपंताना कैद केले; पण यांना त्यावेळी हरप्रयत्न करून सिद्धगडाचा ताबा काही घेता आला नाही.

इ. स. १८१८ मध्ये इंग्रज-मराठे युद्धात कर्नल इम्लाकने जास्त कुमक मागवून सिद्धगडावर तोफांची प्रचंड मारगिरी करीत ताबा मिळविला.
पहाण्याची ठिकाणे :
सिध्दगड किल्ला सिध्दवाडी सड्याच्या पश्चिम टोकावर असलेल्या निमुळत्या भागात वसलेला आहे. ओवळीये गावातून सड्यावर आल्यावर पश्चिम दिशेला असलेल्या दाट झाडीकडे चालत जावे. या झाडी जवळ एक मोबाईल टॉवर आहे. सड्यावर आल्यावर आपण ५ मिनिटात गडाच्या खंदकापाशी पोहोचतो. सड्या पासून गडाला वेगळे करण्यासाठी येथे खंदक आणि तटबंदी बांधून संरक्षित करण्यात आले होते. सध्या ही तटबंदी खंदकात ढासळलेली आहे. या ढासळलेल्या तटबंदीवरुन खंदक ओलांडून आपला गडात प्रवेश होतो. गडाची रुंदी अंदाजे २०० फ़ूट असून तो लांबवर पसरलेला आहे. गडावर दाट जंगल असून गडाचे अवशेष त्यात लपलेले आहेत. गडात प्रवेश केल्यावर झाडाच्या खोडात गुरफ़टलेले वास्तूंचे अवशेष दोन्ही बाजूला दिसतात. ते पाहात पुढे गेल्यावर एका मोठ्या वाड्याचा चौथरा पाहायला मिळतो. त्यावर छ. शिवाजी महाराजांची मुर्ती ठेवलेली आहे. वाड्याच्या मागची भिंत म्हणजे तटबंदी असून ती किल्ल्याच्या संपूर्ण रुंदीभर पसरलेली आहे. त्यात उजव्या बाजूला छोटा दरवाजा होता होता आज तो ढासळलेला आहे. वाड्याच्या उजव्या बाजूल असलेल्या ढासळलेल्या तटबंदीतून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला दक्षिणाभिमुख प्रवेश्व्दाराचे अवशेष व खाली उतरणारी वाट दिसते पण दाट झाडीमुळे या वाटेने खाली उतरता येत नाही.

प्रवेश्व्दाराचे अवशेष पाहून पुढे जातांना डाव्या बाजूला तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. उजव्या बाजूला झाडीत लपलेले काही वास्तूंचे अवशेष आहेत. ते पाहून पुढे चालत गेल्यावर एक कातळात खोदलेले आयताकृती मोठे टाके कोरडे टाके आहे. या टाक्याला लागून तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. तिथून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिम टोकावर शंकराचे (सिध्देश्वर) दगडी मंदिर आहे. मंदिरा समोर दोन खांब आहेत. मंदिर पाहून पुन्हा आल्या वाटेने गड प्रवेश केलेल्या तटबंदीपाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गड फ़ेरीस पाऊण तास लागतो.




किल्ल्यात दाट झाडी आहे. माणसांचा वावर नाही . त्यामुळे किल्ल्यावर वन्यजीव व सापांचा वावर आहे. त्यामुळे किल्ल्यावर फ़िरतांना योग्य ती काळजी घ्यावी.
पोहोचण्याच्या वाटा :
ओवळीये हे सिध्दगडच्या पायथ्याचे गाव आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण व कणकवली या दोनही शहरातून येथे जाता येते.

१) मालवण - आचरा मसदे - ओवळीये - सिध्दगड (३५ किमी) किंवा मालवण (३३ किमी) - कसाल - (३ किमी) ओवळीये या दोन मार्गांनी किल्ल्या पायथ्याच्या ओवळीये गावात पोहोचता येते.

२) कणकवलीहून मुंबई - गोवा महामार्गाने कुडाळकडे जाताना कसाल गावाच्या (१ किमी) अगोदर ओवळीये -हिवाळे या गावांकडे जाणारा फाटा आहे. तेथून ओवळीये २ किमी वर आहे.

३) मालवण - कसाल किंवा कणकवली - कसाल बससेवा आहे. कसालहून ओवळीयेला जाण्यासाठी ठराविक वेळेतच बसेस आहेत. म्हणून कसालहून जाण्या येण्याकरीता रिक्षा ठरवून गडावर जावे.

ओवळीये गावातून हिवाळे गावाच्या दिशेला जातांना डाव्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या पुढे उजव्या बाजूला एक रस्ता क्रशरकडे जातो. तोच रस्ता पुढे डोंगर चढून सिध्दगडवाडीकडे जातो. डोंगराच्या शेवटच्या टप्प्यात हा रस्ता कच्चा आहे. खाजगी वहानाने या रस्त्याने १० मिनीटात आपण सिध्दगडच्या सड्यावर (पठारावर) पोहोचतो. हा रस्ता पुढे सिध्दगडवाडीकडे जातो. पण तिकडे न जाता. डोंगर चढून सड्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजूला (पश्चिमेकडे) दिसणार्‍या दाट झाडी आणि मोबाईल टॉवरच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. ५ मिनिटात आपण मोबाईल टॉवरपाशी पोहोचतो. मोबाईल टॉवरच्या बाजूने किल्ल्यात जाण्याची वाट आहे.
राहाण्याची सोय :
ओवळीये गावातील शाळेच्या ओसरीवर १० जणांची रहायची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, ३ किमी वरील कसाल गावात होऊ शकेल.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
ओवळीये गावातून चालत ४५ मिनीटे लागतात, तर वाहनाने १० मिनीटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जानेवारी ते मे
सूचना :
मालवणहून सकाळी निघून (१२ किमी) मसूरे जवळील भरतगड व भगवंतगड पाहून (१७ किमी) रामगडला जाता येते. तसेच रामगडहून ओवळीये गावातील (१० किमी) सिध्दगड पाहून कसाल मार्गे (३६ किमी) मालवणला येता येते. या मार्गाने हे ४ किल्ले एका दिवसात पाहून होतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: S
 सडा किल्ला (Sada Fort)  सदानंदगड (Sadanandgad)  सदाशिवगड (Sadashivgad)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)
 सज्जनगड (Sajjangad)  साल्हेर (Salher)  सालोटा (Salota)  सामानगड (Samangad)
 सामराजगड (Samrajgad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  संतोषगड (Santoshgad)
 सप्तश्रुंगी (Saptashrungi)  सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))
 साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  सेगवा किल्ला (Segawa)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 शिवगड (Shivgad)  शिवनेरी (Shivneri)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))
 सिध्दगड (Sidhhagad)  सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सिंदोळा (Sindola)
 सिंहगड (Sinhagad)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort))  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सोंडाई (Sondai)  सोनगड (Songad)  सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))
 सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुधागड (Sudhagad)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 सुमारगड (Sumargad)  सुरगड (Surgad)  सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)