मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सिंदखेडराजा (Sindkhed Raja) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बुलढाणा श्रेणी : सोपी
सिंदखेडराजा हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव जिजामातांचे जन्मस्थळ आहे . येथे असलेल्या लखुजी जाधवांच्या गढीत जिजाऊचा जन्म झाला होता . त्यामुळे हे स्थळ आता मातुलतिर्थ या नावाने ओळखले जाते . लखुजी जाधवांची गढीची देखभाल पूरातत्व खात्याने उत्तमप्रकारे ठेवलेली आहे . सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळात १०/- रुपयाचे तिकिट काढून गढीत जाता येते.


सिंदखेडराजा गावातील गढी , काळा कोट , रंगमहाल , निळकंठेश्वर मंदिर , सजना बारव, रामेश्वर मंदिर , लखुजी जाधव आणि त्यांच्या पुत्रांच्या समाध्या , पुतळा बारव , चांदनी तलाव आणि मोती तलाव या ऐतिहासिक वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.
27 Photos available for this fort
Sindkhed Raja
इतिहास :
सिंदखेड येथे गवळी राजाची राजवट होती . त्याने गाई गुरांसाठी गावात काही तलाव बांधले . सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती . गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली . यातून मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती महिला वाचली . ती दौलताबादला लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली . लखुजी जाधव हे निजामशहाचे पंचहजारी मनसबदार होते. सिंदखेड परगणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांनी फौजेनिशी जाऊन रविरावचे बंड मोडून काढले . मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा कोणीही नसल्याने लखुजी जाधवाना १५७६ ला सिंदखेडची देशमुखी मिळाली . त्यानंतर सिंदखेडची भरभराट झाली . लखुजी जाधवांनी सिंदखेडमध्ये गढी बांधली , बाजारपेठा वसवल्या . निळकंठेश्वर रामेश्वर मंदिरांची दुरुस्ती केली .

लखुजी जाधवांची पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी पौष शुद्ध पौर्णिमा शके १५१९ म्हणजेच १२ जानेवारी १५९८ या दिवशी गढीतील राजवाड्यात जिजाऊचा जन्म झाला . इसवीसन १६१० मध्ये शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह सिंदखेडराजा येथे झाला .

२५ जुलै १६२९ रोजी निजामाने लखुजी जाधव यांना दौलताबादेस बोलवले. लखुजी जाधव , पत्नी म्हाळसाबाई , भाऊ जगदेवराव , पुत्र अचलोजी , राघोजी व बहादूरजी , नातू यशवंतराव यांच्यासह दौलताबादला गेले.

लखुजी राजे दरबारात जाताच निजामाच्या मारेकऱ्यांनी लखुजी जाधव त्यांचे दोन पुत्र आणि नातू यांना ठार केले .
पहाण्याची ठिकाणे :
गढी सिंदखेडराजा गावात भर वस्तीत आहे . गढीच्या बाहेरच्या बाजूला बगिचा बनवलेला आहे . त्यात जिजामातेचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे . गढीचा प्रवेशद्वार भव्य आहे. गढीच्या भिंती १५ फुटापर्यंत दगडाने बांधलेल्या असून त्यावर विटांचे बांधकाम केलेले आहे. विटांच्या बांधकामात जंग्या ठेवलेल्या आहेत . प्रवेशद्वारावर नगारखाना आहे . प्रवेशव्दारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत . त्यात सध्या पुरातत्व खात्याने अनेक मुर्ती, वीरगळ , जाती आणून ठेवलेल्या आहेत . हे सर्व पाहून गढीत प्रवेश केल्यावर समोरच राजवाड्याची भिंत दिसते . एकेकाळी हा राजवाडा दोन मजले उंच होता. आता मात्र त्याचे भग्नावशेष राहीलेले आहेत . पुरातत्त्व खात्याने उरलेल्या अवशेषांची योग्य डागडूजी केलेली आहे . गढीत शिरल्यावर उजव्या बाजूला गेल्यावर तटबंदीला लागून एक विहीर आहे . गढीतील पाण्याचा हा एकमेव स्त्रोत असावा. विहिर पाहून वाड्याच्या टोकापर्यंत चालत जावे . या ठिकाणी वरच्या बाजूला एक खोली आहे . ते जिजामाताचे जन्मस्थान आहे . या खोलीत जिजामाता आणि बाल शिवाजी यांचा पुतळा बसवलेला आहे . वाड्याला तळघर आहे . तळघरात उतरण्यासाठी चार ठिकाणी जीने आहेत . वाड्याच्या मधल्या भागात सुंदर बगिचा केलेला आहे . तळघरात उतरणाऱ्या जिन्याने खाली उतरल्यावर कमानींवर तोललेला व्हरांडा पाहायला मिळतो. व्हरांड्याच्या एका बाजूला खोल्या आहेत. व्हरांड्यात आणि खोल्यान्मध्ये हवा आणि प्रकाश खेळता राहावा यासाठी झरोके केलेले आहेत . झरोक्यांची रचना अशाप्रकारे केलेली आहे की , प्रकाश आत येइल पण पावसाचे पाणी आत येणार नाही .

तळघर पाहून वाड्याच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर यावे . याठिकाणी जे अवशेष उरले आहेत त्यावरून येथे कचेरी किंवा दरबार हॉल असावा .

हे सर्व पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गढीची फेरी पूर्ण होते. गावातील ऐतिहासिक ठिकाणे पाहाण्यासाठी गढीच्या समोर असणारा जालना रस्ता गाठावा . या रस्त्याने जालनाच्या दिशेने ५ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला एक गल्ली जाते . या गल्लीत शिरल्यावर थोडे पुढे उजव्या बाजूला तटबंदी आणि बुरुज दिसतात. चार बुरुज आणि तटबंदी असलेल्या या वास्तूला काळा कोट म्हणतात. तटबंदीच्या आत पुरतत्व खात्याने बनवलेले म्युझिअम आहे .

काळाकोट पाहून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला रंगमहाल आहे . या महालाची रचना चौसोपी वाड्यासारखी आहे . महालात शिरण्यासाठी प्रवेशव्दार आणि त्याच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. महालाचे लाकडी छत पुन्हा नव्याने बनवलेले आहे . महालाच्या गच्चीवर जाण्यासाठी जीने आहेत . गच्चीवर पाण्याचा कोरडा हौद आहे . या हौदाच्या बरोबर खाली असलेल्या तळमजल्यावरील खोलीत शौचकूप आहेत.

रंगमहाल पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण निळकंठेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिरा लागूनच एक बारव आहे. सजना बारव या नावाने ती ओळखली जाते . बारवेच्या काठावर ३ पिंडी आहेत. मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर शेषशायी विष्णूची अप्रतिम मुर्ती आहे . मंदिराची रचना वाड्यासारखी असून त्यात विटानी बांधलेल्या कमानी सुंदर आहेत .

निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर रामेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या अलीकडे शेताच्या कडेला काही समाध्या आहेत . याठिकाणी एक गणेशमुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. ऱामेश्वर मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे . मंदिरावर फारसे कोरीवकाम नाही . मंदिराच्या आतील खांबावर काही मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरात काही तुळशी वृंदावन आहेत .

रामेश्वराचे दर्शन घेउन त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर लखुजी जाधवांची , त्यांचे पुत्र आणि नातवाची भव्य समाधी आहे. समाधीच्या बांधकामात इस्लामी बांधकाम शैलीची छाप पडलेली आहे. समाधीच्या समोरच्या बाजूला छोट्या समाध्या आहेत .

वरील सर्व ठिकाणे पाहायला एक तास लागतो. पुन्हा आल्या मार्गाने मुख्य रस्त्यावर यावे आणि जालन्याच्या दिशेने चालायला सुरुवात करावी . साधारण १० मिनिटात उजव्याबाजूला एक तलाव आणि त्याच्या मधोमध पाण्यात बांधलेला एक छोटेखानी महाल दिसतो. तो चांदनी तलाव आहे.
त्याच रस्त्याने १ किलोमीटर पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एका तलावाची भिंत आणि त्यात बनवलेला महाल दिसतो. या तलावाला मोती तलाव या नावाने ओळखले जाते. महाल दोन मजली असून खालचा मजला पाण्याच्या पातळीच्या थोडा वर आहे . महालाचे सज्जे तलावाच्या बाजूला काढलेले आहेत . तलावात उतरण्यासाठी महालात जीने आहेत.

या तलावांबरोबरच गावात पुतळा बारव नावाची अष्टकोनी बारव आहे. या बारवेच्या भिंतीवर असलेल्या सुरसुंदरीच्या मुर्तीमुळे ही बारव पुतळा बारव या नावाने ओळखली जाते .

सिंदखेडराजा मधील ही सर्व ऐतिहासिक ठिकाणे पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
सिंदखेडराजा रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. सर्व महत्वाच्या शहरातून सिंदखेडराजाला एसटीच्या बसेस जातात. सिंदखेडराजाहून जवळचे रेल्वे स्टेशन जालना आहे . जालन्याहून एका तासात सिंदखेडराजाला पोहोचता येते .
राहाण्याची सोय :
सिंदखेडराजा गावात राहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गावात आहे.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी सोबत बाळगावे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: S
 सडा किल्ला (Sada Fort)  सदानंदगड (Sadanandgad)  सदाशिवगड (Sadashivgad)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)
 सज्जनगड (Sajjangad)  साल्हेर (Salher)  सालोटा (Salota)  सामानगड (Samangad)
 सामराजगड (Samrajgad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  संतोषगड (Santoshgad)
 सप्तश्रुंगी (Saptashrungi)  सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))
 साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  सेगवा किल्ला (Segawa)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 शिवगड (Shivgad)  शिवनेरी (Shivneri)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))
 सिध्दगड (Sidhhagad)  सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सिंदोळा (Sindola)
 सिंहगड (Sinhagad)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort))  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सोंडाई (Sondai)  सोनगड (Songad)  सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))
 सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुधागड (Sudhagad)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 सुमारगड (Sumargad)  सुरगड (Surgad)  सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)